आज दि.०२/०५/२०२३ रोजी मंगळवार अद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मुतिदिनानिर्मित विनम्र अभिवादन... कोळी महादेव समाजातील राघोजी भांगरे कोण होते त्याचा इतिहास पहा

 


*सह्याद्रीचा वाघ राघोजी भांगरे*

राघोजीराव रामजीराव भांगरे (जन्म:८ नोव्हेंबर, १८०५; मृत्यू:२ मे, १८४८) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते.

अकोले तालुक्यातील देवगाव हे दोनशे ते तीनशे लोकांचे गाव असेल. शोण नदीच्या किना-यावर वसलेल्या महाकाळ डोंगर रांगेतील चोमदेव डोंगराच्या पश्चिमेकडील या गावात ८ नोव्हेंबर १८०५ रोजी रामजी व रमाबाई यांच्या पोटी राघोजी भांगरे यांचा जन्म झाला. त्या काळातील जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे रामजी सुभेदार होते. सुभेदाराच्या घरात थोरल्या मुलीनंतर मुलाचा जन्म झाल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राघोजीवर लहानपणापासून चांगले संस्कार करण्याकडे घरातील सर्वांचे खास लक्ष्य होते. त्याकाळात गावात शिक्षणाची सोय नसतानाही राघोजीसाठी खास घरी शिकण्याची सोय करण्यात आली होती. खेळण्याबागडण्याच्या वयात राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालवणे, बंदुकीने निशाणा साधने, घोडेस्वारी शिकून तरबेज झाली. त्यांच्या अंगातील धाडसी गुण लहानपणीच गावकऱ्यांना दिसून येत होते. लहानपणापासून राघोजीला व्यायामाची आवड होती. त्यामुळे त्याचे शरीर सुदृढ होते. महाकाळ डोंगराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल होते. विविध प्रकारचे पक्षी व प्राणी या जंगलात वास्तव्य करत होते. एकदा राघोजी शिकारीसाठी आपल्या काही सोबत्यांना घेऊन गेला होता. रानात फिरता फिरता त्यांना वाघ दिसला. आपल्या बंदुकीचा चाप ओढून राघोजीने गोळी झाडली. परंतु यांच्या पायांच्या आवाजाने सावध झालेल्या वाघाने ती गोळी चुकवली. ती गोळी वाघाच्या मानेजवळ चाटून गेली. जखमी झालेला वाघ चवताळला व त्याने परत हल्ला करत राघोजीवर झेप घेतली. अंगावर चालून आलेल्या वाघाला घाबरून न जाता अतिशय सावधरीतीने वाघावर प्रतिहल्ला केला. दोघांमध्ये धरपकड सुरू झाली. काही क्षणात राघोजीने वाघावर आपले वर्चस्व सिद्ध करत त्याचा खालचा जबडा एका हाताने व वरचा जबडा एका हाताने धरून फाडला. रक्ताच्या थारोळ्यात वाघ जागेवर पडला होता. राघुजीच्या या धाडसी पराक्रमाचे कौतुक सर्व परिसरातील लोक करू लागले होते.

राघोजींचा जन्म महादेव कोळी जमातीत झाला. मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या, वतनदाऱ्या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरिब सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले [ संदर्भ हवा ]. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली.[१]

इ.स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले [ संदर्भ हवा ]. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि पगारातली काटछाट यामुळे राघोजी चिडला. नोकरी सोडून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापूजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंटॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर वरमले नाहीत. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद केले. दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.

ठाणे गॅझेटियराच्या जुन्या आवृत्तीत लिहिल्याप्रमाणे "ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले", असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी राघोजीच्या आईचे निर्दयपणे हाल केले.[२] त्यामुले चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व नाशिक येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.[३] राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पळाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गॅझेटियरमध्ये सापडतो.

साताऱ्याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्‍न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणाऱ्या सावाकरांना धडा शिकविणे या हेतूने [ संदर्भ हवा ] राघोजी खंडणी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरू झाले. नोव्हेंबर इ.स. १८४४ ते मार्च इ.स. १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने 'आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत', अशी भूमिका जाहीर केली होती [ संदर्भ हवा ]. कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे[ संदर्भ हवा ]. शौर्य, प्रमाणिकपणा व नीतिमत्ता याला त्याने धार्मिकपणाची जोड दिली. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती[ संदर्भ हवा ]. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्रंबकेश्वर, नाशिक, येथे राघोजीची भारी दहशत होती. जुन्नर येथील लढाईत मात खाल्यानंतर राघोजी कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला. पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणाऱ्या राघोजीला इंग्रजांनी पकडले व ठाण्यास नेले. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता. त्यांला इंग्रजी अधिकाऱ्यानी वकील मिळू दिला नाही. त्याने कोर्टात स्वतःच बाजू मांडली[ संदर्भ हवा ].

राघोजीचा असा अवतार पाहून बाकीचे हवालदार कधीच पळून गेले होते. परत फिरताना राघोजीने पोलीस स्टेशनमधील सात रायफली व काडतुसांची पेटी हातात घेतली. इंग्रजांनी केलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी राघोजी सज्ज झाला होता. येथून पुढचा प्रवास अधिक संघर्षमय असेल याची जाणीव त्याला झाल्याने त्याने आईचा आशीर्वाद घेऊन घर सोडले व बाडगीच्या घनदाट जंगलाचा रस्ता धरला. यावेळी त्याच्यासोबत तरणाबांड तुफान ताकदीचा नेमबाजीत पटाईत असलेला शूर लढवय्या राया ठाकर होता. तसेच देवजी आव्हाड यांचे मोलाचे मार्गदर्शनही लाभत होते.


राघोजी भांगरे याचे संघटन कौशल्य खुपच चांगले व त्याच्या कार्याची जाणीव सर्वांना असल्याने आठ दिवसात मुळा खोरे, चाळीसगाव डांगाण म्हणजे प्रवरा खोरे, बारागाव पठार म्हणजे प्रवरा खोरे या परिसरातून विविध जाती जमातीचे अनेक तरुण त्यांना येऊन मिळाले. अन्यायी, अत्याचारी सरकार, सावकार, जमीनदार यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राघोजीच्या नेतृत्वाखाली सर्वजण करू लागले. जंगलात राहून वेळप्रसंगी भाजी-भाकरी, चटणी खाऊन, तर कधी उपाशी पोटी जनसंपर्क करत होते. सरकारवर विसंबून राहू नका, सरकारला कोणताही कर भरू नका...तुमचा कर राघोजीला द्या...तो तुम्हाला मदत करील असे आवाहन सगळीकडे करण्यात येऊ लागले. अगोदरच सावकारांच्या जाचाला व इंग्रजांच्या अन्यायी धोरणाला वैतागलेले सामान्य लोक न्याय मागण्यासाठी राघोजीकडे येऊ लागले. अशा प्रकारे महाकाळ डोंगरावर बंडाचं पहिलं निशाण फडकविण्यात आलं. 

पुणे या भागातूनही निरोप येऊ लागले होते. हे सर्व करत असताना धोकेही वाढत होते याची जाणीव राघोजीला झाली होती. तसेच आपले संघटन अधिक सक्षम व मोठे करण्याचे आवाहनही त्याच्यासमोर होते. एकीकडे संघटन वाढवत दुसरीकडे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण या भागातील सावकारशाहीचा बिमोड केला. यानंतर राघोजीने बाडगीच्या माचीमध्ये असलेले आपले निवासस्थान अलंग व कुलंग या दुर्गांवर हालविले.


इंग्रज आपली सत्ता सावकार व जमीनदार यांच्या मदतीने वाढवत असत. परंतु राघोजी भांगरे याने सावकारशाहीवर आपला विजय मिळविण्याचा धडाका लावल्यामुळे त्याचा इंग्रजांवर मोठा परिणाम होऊ लागला होता. या प्रकाराने इंग्रज अधिकारी चांगलेच हादरले होते. राघोजीचा सामान्य जनतेला पाठिंबा असल्याने सर्वसामान्य माणूस इंग्रज सत्तेविरोधात बोलण्याचे धाडस करू लागला होता. नेमके हेच इंग्रज सरकारला नको होते. राघोजीचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर आपली या भागातील सत्ता जाईल या भीतीने २०० बंदुकधारी शिपायांची तुकडी घेऊन कॅ. Thomas यास जबाबदारी नेमून दिली.


कॅ. Thomas यांस त्याच्या गुप्तहेरांनी खबर दिली कि राघोजी सध्या कुलंग गडावर वास्तव्यास आहे. त्यानुसार घनदाट जंगलातून वाट काढत अलंग गडाच्या माचीतून कॅ. Thomas आपल्या शिपायांसह पुढे आगेकूच करू लागला होता. तिकडे राघोजीला याची खबर अगोदरच मिळाल्याने त्याने कॅ. Thomasचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्ण नियोजन केले होते. कॅप्टनने अलंगगडाच्या माचीचे घनदाट जंगल ओलांडून पुढे जायला सुरुवात करताच पाठीमागून बापू भांगरे यांनी आपल्या साथीदारांसह जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने व खूप अंतर पायी चालल्याने परतीचा हल्ला करण्याची क्षमता कॅटनच्या शिपायांत उरली नव्हती. तिकडे देवजी आव्हाड यांनीही दुसरीकडून हल्ला चढवला. एकच आवाज त्या झाडांमध्ये येत होता, “पळा पळा.’’ कॅप्टनचे शिपाई वाट दिसेल तिकडे पळू लागले. झाडीत लपून बसलेल्या देवजी आव्हाड यांच्या साथीदारांनी एका एका सैनिकाचे मुंडके उडविण्याचे काम केले. धरमा मुंढे, खंडू साबळे हे सुद्धा आता समोरून तुटून पडले होते. या घनदाट जंगलात नक्की किती लोकांनी आपल्यावर हल्ला केला आहे याची कल्पना कॅप्टनला येत नव्हती. कॅप्टन वेड्यागत चौफेर फायरिंग करत परतीच्या वाटेने खाली उतरण्यासाठी पळत होता. या धावपळीत झाडांमधून आलेली एक गोळी कॅप्टनच्या डाव्या मांडीला चाटून गेली होती. यामुळे कॅप्टनने आपला जीव वाचविण्याच्या इराद्याने लपत छपत मागे फिरला. तो मिळेल त्या वाटेने थेट काळुस्ते या गावात उतरला. या धुमश्चक्रीत राघोजीच्या मावळ्यांनी एकशे शहाण्णव शिपायांची कत्तल केली होती. या लढाईत राघोजीला मोठ्या प्रमाणात काडतुसे हाती लागली होती. इंग्रज सरकार राघोजीच्या या कृत्याने प्रचंड हादरले होते. राघोजीचे बंड मोडीत काढण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नवे नवे बेत आखत होते. परंतु कोणाला यश मिळत होते.


सामान्य लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम राघोजी भांगरे करू लागल्याने त्याच्या विषयी कोणीही सरकारला माहिती देत नव्हते. राघोजीने नाशिक परिसरातही आपली सावकारांविरोधातील मोहीम सुरू ठेवली होती.

राघोजी भांगरे यांच्या कार्याचा प्रभाव वाढत असताना इंग्रज सरकारच्या समोर त्याला रोखायचे कसे याचे मोठे आव्हान उभे राहिले होते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, प्रसंगी बक्षिसांचे आमिष दाखवले, परंतु कोणीही राघोजीचा ठावठिकाणा सांगण्यास पुढे येत नव्हते. यामुळे इंग्रज अधिका-यांसाठी पेच प्रसंग निर्माण झाला होता. अनेकदा राघोजीला पकडण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळ्या तुकड्या पाठवल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी अपयश आले. या प्रकारामुळे आलेली नामुष्की पचविणे इंग्रज अधिका-यांना जड जाऊ लागले होते. त्यांनी आता राघोजीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अत्याचारी पवित्रा अवलंबिला होता. राघोजीच्या घरातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. बाया माणसांच्या वक्षस्थळांना टिप-या लावल्या. वारंवार राघोजीच्या घरी धाडी घातल्या. तरीही हाती काही लागत नसल्याने शेवटी त्याची आई रमाबाईला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्या अंगावर चाबकाचे फटके मारले. तिच्यावरही शक्य तितके क्रूर अत्याचार केले. परंतु आई रमाबाई डगमगली नाही. तिने इंग्रज अधिका-यांना त्यांच्या अन्यायी वागण्याबद्दल खडे बोल सुनावले. गावागावात जाऊन महादेव कोळी व ठाकर समाजातील लोकांना छळण्यात आले परंतु त्याचा काहीही एक फायदा इंग्रजांना झाला नाही.

यांनी ग्वाल्हेरचे संस्थान खालसा केले. या संस्थानात अंतोबा लोटे हा सुभेदार पदावर होता. तो खूप कर्तुत्वान असल्याने त्याला एक वेगळा मान होता. परंतु संस्थान खालसा झाल्याने त्याच्याही मनात इंग्रजांविषयी द्वेष निर्माण झाला होता. याचा बदला घेण्यासाठी तो राघोजी भांगरे यांना येऊन मिळाला. यामुळे राघोजीची ताकद अधिक वाढली होती.


राघोजी भांगरे यांची ताकद व दरारा आता अधिक वाढला होता. आज पर्यंत इंग्रजांशी छुप्या मार्गाने आपण लढत आलो आहोत, आता समोरासमोर दोन हात करण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली होती. सन १८४५ मध्ये चार जिल्ह्यांचे कलेक्टर, गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट व राज्यपाल एलफिंस्टन यांना जुन्नर येथे आपण जाहीर उठाव करणार असल्याचे पत्रही पाठविले. सदर उठाव मोडीत काढण्याचे आवाहनही त्याने पत्रांतून इंग्रज सरकारला केले होते. जुन्नर ही त्या काळात एक महत्त्वाची बाजारपेठ असल्याने इंग्रजांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले होते. या उठावाला सामोरे जाण्यासाठी व राघोजीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी धूर्त व धाडसी अधिकारी कॅप्टन Mackintosh याच्यावर सोपविण्यात आली.


कॅप्टन Mackintosh याने जुन्नरच्या बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास केला व हा उठाव कसा रोखायचा व राघोजी कसा जाळ्यात अडकावायचा याचे नियोजन केले. यासाठी सोबत त्याने दहा हजारांची फौज व तोफखाना घेतला होता. तिकडे राघोजीकडे फक्त दोन हजार सैनिक होते. शेवटी ठरलेला दिवस उगवला. राघोजी भांगरे व त्याच्या सर्व साथीदारांनी जुन्नरच्या बाजारपेठेत ‘हर हर महादेव’ची गर्जना करत प्रवेश केला. कॅप्टन Mackintosh ने जुन्नरला बाहेरून वेढा दिला व राघोजी भांगरे आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. दोन्ही सैन्य समोरासमोर येताच एकच लढाई सुरू झाली. राघोजीचे मावळे आपले सारं देहभान हरपून लढत होते. एकीकडे कॅप्टन Mackintoshची फौज कमी कमी होत होती तर दुसरीकडे राघोजीचे शंभर एक मावळे शिल्लक राहिले होते. देवजी आव्हाड यांनी वस्तुस्थितीचे भान राघोजीच्या लक्षात आणून दिले. ऐंशी टक्के फौज कामी येऊनही कॅप्टन Mackintoshच्या हाती राघोजी भांगरे लागला नव्हता. जुन्नरच्या बाजारपेठेचा फायदा उठवत तो सहीसलामत बाहेर पडला होता.


जुन्नरच्या उठावात मोठ्या प्रमाणात साथीदार गमावल्याने राघोजी दुखी झाला होता. आता भूमिगत राहून काम करण्याचा निर्णय घेतला. राया ठाकर व देवजी आव्हाड यांच्या सोबत त्याने गोसाव्याचे रूप धारण केले. मावळ प्रांतात गावोगावी फिरून लोकांना जागृत करण्याचे काम करू लागले. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रजांनी दहा हजार रुपये व गाव ईनाम देण्याची घोषणा केली होती.


महानायक राघोजी फिरता फिरता पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनाला पोहचला. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. बारीत उभे असताना दुरून एक पोलीस राघोजीचे निरीक्षण करत होता. राघोजीचे मात्र त्या पोलिसाकडे लक्ष्य नव्हते. पोलिसाला दर्शन रांगेत राघोजी भांगरे उभा असल्याची खात्री पटली. क्षणाचाही विलंब न करता त्याने कॅप्टन गिलला निरोप दिला. त्यावेळी गिलची नेमणूक तिथेच होती. निरोप मिळताच कॅप्टन गिल शेकडो पोलिसांना घेऊन मंदिरात हजर झाला. सर्वांनी राघोजीला वेढा दिला व त्याच्याकडे बंदुका रोखल्या. राघोजी निशस्त्र असल्याने तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. साखळदंडात कैद करून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात राघोजीला ठाण्याच्या कारागृहात आणण्यात आले. त्याच्यावर खटला भरण्यात आला. राघोजी भांगरे याच्या कोणत्याही मताचा विचार न करता एकतर्फी निकाल घोषित करण्यात आला. दुर्दैव म्हणजे राघोजीला वकील मिळू नये म्हणून इथल्याच उच्च वर्णीय लोकांनी प्रयत्न केले होते. कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा जाहीर केली. राघोजीला फाशी देण्यापूर्वी वरिष्ठ इंग्रज अधिका-यांनी राघोजी भांगरे हा एक महान, शूर, लढवय्या, धाडसी वीर असल्याने त्याचे तैलचित्र काढून कारागृहात लावण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला देखील इथल्या उच्च वर्णीय लोकांनी हाणून पाडले. फाशीपूर्वी राघोजीला शेवटची इच्छा विचारण्यात आली.


"फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने एकदम वीर पुरुषासारखे मरण द्या"


असे त्याने इंग्रज अधिका-यांना ठणकावून सांगितले. शेवटी दि. २ मे १८४८ रोजी ठाणे येथील कारागृहात राघोजीला फाशी देण्यात आली. अशा प्रकारे हसतहसत सह्याद्रीचा वाघ आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शहीद झाला.

जय आदिवासी

हर हर महादेव

*राघोजी भांगरेंच्या सैनिका सारखे सारखे आज ही समाजाने एकत्र येणे गरजेचे*

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...